भारत आणि कतार यांच्यातला व्यापार येत्या ५ वर्षात दुप्पट करुन २८ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा निर्धार दोन्ही देशांनी केला आहे. त्यासाठी लवकरच मुक्त व्यापार करार केला जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि कतारचे आमीर शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा झाली. यावेळी दोन्ही देशांनी धोरणात्मक भागिदारी आणि दुहेरी करनिर्धारण टाळण्यासाठीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. तसंच आर्थिक भागिदारी वाढवणं, पुराभिलेखांचं व्यवस्थापन, क्रीडा आणि युवक व्यवहार क्षेत्रातले संबंध मजबूत करण्यासाठीही यावेळी करार झाले. व्यापार, ऊर्जा सुरक्षा, गुंतवणूक, तंत्रज्ञान या क्षेत्रातले संबंध आणखी दृढ करण्यावर यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अरुण कुमार चटर्जी म्हणाले.
सकाळी कतारच्या आमीर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन चर्चा केली.
भारत आणि कतार बिजनेस फोरमची परिषदही आज झाली. दोन्ही देशांमधले संबंध तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि ऊर्जा यासारख्या गोष्टींवर अवलंबून असतील, असं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल म्हणाले. विकसित भारत २०४७ आणि कतार नॅशनल VISION २०३० दोन्ही देशातल्या लोकांच्या आयुष्यात संपन्नता आणेल, असंही ते म्हणाले.