भारताचे कतारशी असलेले संबंध अनेक शतकं जूने असून, कतार, पश्चिम आशियातील भारतासोबतच्या व्यावसायिक आणि सांस्कृतिक संबंधांचा अविभाज्य भाग आहे असं प्रतिपादन राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. भारताच्या दौऱ्यावर असलेले कतारचे आमीर, शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या विशेष भोजन समारंभात त्या बोलत होत्या.
दरम्यान, प्रधानमंत्र नरेंद्र मोदी आणि कतारचे आमीर शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्यात काल नवी दिल्लीत चर्चा झाली. चर्चेदरम्यान, भारत आणि कतार यांच्यातला व्यापार येत्या ५ वर्षात दुप्पट करुन २८ अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा निर्धार उभय देशाच्या नेत्यांनी व्यक्त केला असून, त्यासाठी लवकरच मुक्त व्यापार करार केला जाणार आहे. या बैठकीदरम्यान, उभय देशांनी धोरणात्मक भागिदारी आणि दुहेरी करनिर्धारण टाळण्यासाठीच्या सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. तसंच आर्थिक भागिदारी वाढवणं, पुराभिलेखांचं व्यवस्थापन, क्रीडा आणि युवक व्यवहार क्षेत्रातले संबंध मजबूत करण्यासाठीही यावेळी करार झाले. व्यापार, ऊर्जा सुरक्षा, गुंतवणूक, तंत्रज्ञान या क्षेत्रातले संबंध आणखी दृढ करण्यावर यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव अरुण कुमार चटर्जी यांनी सांगितलं.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी देखील काल कतारचे आमीर शेख तमिम बिन हमद अल थानी यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्यांवर चर्चा केली.
भारतीय उद्योग महासंघातर्फे आयोजित भारत-कतार संयुक्त व्यापार मंचांची परिषद काल नवी दिल्लीत पार पडली. भारत आणि कतार दरम्यान सहकार्याला प्रचंड वाव असून ते वृद्धिंगत करण्याचा उभय राष्ट्रांचा निर्धार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना केलं.