कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी भारत दौऱ्यावर असून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्याशी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करत आहेत. शेख तमीम यांचं काल रात्री नवी दिल्ली विमानतळावर आगमन झालं त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. शेख तमीम यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन चर्चा केली. राष्ट्रपती भवनात पाहुण्याना पारंपरिक मानवंदना देण्यात आली.
शेख तमीम यांच्यासोबत उच्चपदस्थ शिष्टमंडळ आलं असून व्यापार, गुंतवणूक, उर्जा, आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्याबद्दल या दौऱ्यात ते चर्चा करणार आहेत. कतार बरोबर भारताचे दृढ आर्थिक संबंध आहेत. अनेक कतारी कंपन्यांनी भारतात तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, विमानतळ, बंदरं अशा विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.