दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज एकंदर ३ लाख ५१ हजार कोटी रुपयांच्या विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या. जेएसडब्ल्यू समूहासोबत झालेल्या ३ लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे राज्यातल्या उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे.
या कराराअंतर्गत गडचिरोलीत २५ मिलियन टन क्षमतेचा अत्याधुनिक पर्यावरणस्नेही पोलाद प्रकल्प उभारला जाईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रीन मोबिलिटी, विद्युत बस, ट्रक आणि परवडण्याजोग्या इलेक्ट्रिक गाड्या, पेट्रोल पंपांवर वेगाने चार्जिंगची सुविधा, राज्याच्या ट्रान्समिशन नेटवर्कचं पुनर्मूल्यांकन होणार आहे. याअंतर्गत विविध क्षेत्रांमध्ये १० हजार रोजगार निर्माण होतील.
कल्याणी उद्योगसमूह आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात संरक्षण, पोलाद आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या क्षेत्रात झालेल्या करारान्वये ५ हजार २५० कोटी रुपयांची गुंतवणूक आणि गडचिरोलीत चार हजारांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार आहेत.
रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरसोबत संरक्षण क्षेत्रात १६ हजार ५०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला. याअंतर्गत रत्नागिरीत २ हजार ४५० रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तर बालासोर ॲलॉयस या कंपनीसोबत पोलाद आणि धातू या क्षेत्रांमध्ये झालेल्या १७ हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारामुळे रायगड जिल्ह्यातल्या दिघी बंदर परिसरात ३ हजार २०० रोजगार तयार होणार आहेत.
विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबतही पोलाद आणि धातू क्षेत्रात १२ हजार कोटी रुपयांचा सामंजस्य करार झाला. यामुळे पालघरमध्ये ३ हजार ५०० जणांना रोजगार मिळेल. तसंच एबी इनबेव्ह या जगातल्या सर्वात मोठ्या ब्रुअरीसोबतही महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगरमध्ये २५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठीचा सामंजस्य करार झाला.
याव्यतिरिक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज जागतिक आर्थिक मंचाच्या कार्यक्रमांअंतर्गत विविध कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांचीही भेट घेतली आणि महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. एएमसीईए अँड इंटरनॅशनल बेव्हरेजेस कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यूजीन विलेमसन आणि पेप्सिकोचे स्टीफन केहो यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. पेप्सिकोला नाशिकमध्ये मूल्यसाखळी निर्माण करून पुढे राज्यभर त्यांच्या कामाचा विस्तार करायचा असून महाराष्ट्र त्यांना शक्य ते सर्व सहाय्य करेल, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. याशिवाय लुई ड्रेफस, मास्टरकार्ड, कॉग्निझंट, कार्ल्सबर्ग इत्यादी कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.