भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज संरक्षण, शिक्षण, क्रीडा, फलोत्पादन आणि वनसंवर्धन या क्षेत्रांंमधे पाच करार झाले. दोन्ही देशांच्या एईओ अर्थात अधिकृत आर्थिक परिचालक कार्यक्रमांना मान्यता देणारा करारही यावेळी झाला.
मुक्त व्यापार कराराबद्दलच्या वाटाघाटींनाही सुरुवात झाल्याचं दोन्ही देशांनी जाहीर केलं. व्यावसायिक आणि कुशल कामगार उपलब्ध करून देण्याबाबतही वाटाघाटी सुरू झाल्याचं दोन देशांनी सांगितलं. न्यूझीलंड इंडो-पॅसिफिक ओशन इनिशिएटिव्हमध्ये दाखल झाल्याचं जाहीर करण्यात आलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झन यांनी आज नवी दिल्लीत विविध विषयांवर बहुआयामी चर्चा केली. द्वीपक्षिय संबंधांना अधिक दृढ करण्याबरोबरच संरक्षण आणि सुरक्षा भागीदारी अधिक मजबूत करण्याचा निर्णय दोघांनी घेतल्याचं मोदी यांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दोन देशातला व्यापार आणि गुंतवणूकीला चालना देण्यासाठी मुक्त व्यापार करारावर वाटाघाटी सुरू करायचा निर्णय झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
कोणत्याही स्परूपातला दहशतवाद खपवून घेतला जाणार नाही असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. न्यूझीलंडमधे काही समाजकंटकांकडून भारतविरोधी कारवाया सुरू असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना ते बोलत होते. दहशतवादी हल्ल्यातल्या दोषींवर कडक कारवाईची गरज असल्यांचं त्यांनी सांगितलं.
लक्झन यांनी आज सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला अभिवादन केलं. ते येत्या बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत