भारत-मॉरिशस दरम्यान सुधारित धोरणात्मक भागीदारी बनवण्याचा निर्णय आपण घेतला आहे, अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. प्रधानमंत्री दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर असून आज झालेल्या दोन्ही देशांच्या संयुक्त वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.
भारत-मॉरिशसच्या भागीदारीचा एक भाग म्हणून मॉरिशसच्या संसद भवनाच्या निर्माणात भारत सहाय्य करेल. मॉरिशसमध्ये १०० किलोमीटर लांबीच्या पाण्याच्या पाईपच्या आधुनिकीकरणासाठी काम केलं जाईल. सामुदायिक विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात ५०० मिलियन मॉरिशियन रुपये खर्चाची विकासकामं सुरू केली जातील, अशी घोषणाही मोदी यांनी केली.
भारत आणि मॉरिशसमध्ये अंतराळ संशोधन, एआय, आरोग्य, सागरी अर्थव्यवस्था, माहिती आणि तंत्रज्ञान तसंच सायबर सुरक्षा या विषयांमध्ये परस्पर संबंध दृढ करणं हे दोन्ही देशांचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीनचंद्र रामगुलाम यांनी सांगितलं. भारतानं मॉरिशसच्या आरोग्य क्षेत्रात आधुनिकीकरण आणलं आहे, त्यासाठी आपण भारताचे आभार मानतो, असं ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात मोदी आणि रामगुलाम यांनी मॉरिशसमधल्या आरोग्य केंद्राचं उद्घाटन केलं.
यावेळी त्यांनी स्थानिक चलनासाठी सेटलमेंट सिस्टिम, क्रेडिट सुविधा करार, राजदुतांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम, व्हाईट शिपिंग माहितीची देवाणघेवाण, आर्थिक गुन्ह्यांना प्रतिबंध, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात सहकार्य, सुशासनासाठी सार्वजनिक अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण या विषयांशी संबंधित ८ सामंजस्य करार उभय देशात झाले.
थोड्याच वेळात साजऱ्या होणाऱ्या मॉरिशसच्या ५७ व्या राष्ट्रीय दिवस समारंभात प्रधानमंत्री मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन’ प्रदान करण्यात येणार आहे. काल भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात नवीनचंद्र रामगुलाम यांनी या पुरस्काराची घोषणा केली. प्रधानमंत्री मोदी यांना इतर देशांकडून मिळालेला हा २१वा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.