प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे प्रधानमंत्री दातो सेरी अन्वर बीन इब्राहीम यांच्यात आज शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. त्यानंतर विविध करारांवर दोन्ही देशांनी स्वाक्षरी केली. श्रम आणि रोजगार, आयुर्वेद आणि पारंपरिक औषधी, डिजिटल तंत्रज्ञान, संस्कृती, पर्यटन, तसंच युवा कल्याण आणि क्रीडा या क्षेत्रांबद्दल हे करार करण्यात आले. सामान्य प्रशासन, प्रशासकीय सुधारणा, आणि परस्पर सहकार्याबाबतही दोन्ही देशात करार करण्यात आले.
भारत आणि मलेशियानं धोरणात्मक भागीदारीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. मलेशिया हा आशियामधला भारताचा महत्वाचा भागिदार असल्याचंही ते म्हणाले.