महिलांच्या आशिया चषक टी-ट्वेटी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला पराभव पत्करावा लागला. श्रीलंकेनं विजेतेपद पटकावलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १६५ धावा केल्या. स्मृती मंधानानं सर्वाधिक ६० धावा केल्या. रिचा घोषनं १४ चेंडूत ३०, तर जेनिमा रॉड्रिग्जनं १६ चेंडूत २९ धावांंचं योगदान दिलं.
भारताची गोलंदाजी मात्र निष्प्रभ ठरली. दिप्ती शर्मानं ४ षटकं टाकताना ३० धावा देत एक बळी मिळवला. तिच्या व्यतिरिक्त भारताच्या इतर कोणत्याही गोलंदाजाला बळी मिळवता आला नाही. श्रीलंकेतर्फे हर्षिता समरविक्रमानं नाबाद ६९, तर कर्णधार चमारी अटापट्टूनं ६१ धावा केल्या. कविशा दिलहारीनं नाबाद ३० धावांचं योगदान दिलं. त्यामुळे सामन्यातले ८ चेंडू बाकी असतानाच श्रीलंकेनं अवघ्या दोन गड्यांच्या मोबदल्यात १६७ धावा केल्या आणि हा सामना ८ गडी राखून जिंकला.