हरित ऊर्जेच्या क्षेत्रात जगाचं नेतृत्व करण्यासाठी भारत सज्ज असून याचाच भाग म्हणून सरकारनं २० हजार कोटी रुपयांच्या ग्रीन हायड्रोजन मिशनला सुरुवात केली आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथं आयोजित चौथ्या जागतिक नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातल्या गुंतवणूकदारांच्या परिषदेत बोलत होते. केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने या परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेला संबोधित करताना प्रधानमंत्र्यांनी भारताने ऊर्जा क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.
भारतानं हरित ऊर्जा क्षेत्रात प्रगती साधण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. ३१ हजार मेगावॉट जलविद्युत निर्मितीच्या प्रकल्पाचं काम सुरू असून यासाठी १२ हजार कोटी रुपये खर्च येणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यांच्या आधारावर देशाचं भविष्य बांधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी पीएम सूर्यघर योजनेच्या यशाबद्दल कौतुक केलं. आतापर्यंत देशभरातल्या सव्वा तीन लाख घरांमध्ये सौर पॅनल बसवण्यात आले आहेत. भविष्यात देशातलं प्रत्येक घर ऊर्जा निर्मिती केंद्र होईल. २१ व्या शतकाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा भारताच्या सौर क्रांतीचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, असं प्रधानमंत्री म्हणाले. सौर पम्पाद्वारे शेतकऱ्याला आत्मनिर्भर बनवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले.
देशातल्या गरीब, पीडित, दलित जनतेला सन्मानाचं आयुष्य मिळेल याची खात्री हे सरकार देतं असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. देशाला तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी १४० कोटी देशवासी झोकून देऊन काम करत असून आजची परिषद ही याच ध्येयाचा एक भाग असल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. या परिषदेला गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू आदी उपस्थित होते.
३ दिवस चालणाऱ्या या परिषदेत महाराष्ट्रासह देशातली अनेक राज्यं सादरीकरण करणार आहेत. तसंच देशोदेशीहून मोठ्या संख्येनं प्रतिनिधी परिषदेत सहभागी होत आहेत.
या कार्यक्रमानंतर प्रधानमंत्री गुजरातमधल्या अहमदाबाद ते गांधीनगर या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केलं. तसंच मेट्रोतून प्रवासा दरम्यान विद्यार्थी आणि सहप्रवाशांशी संवाद साधला. यानंतर मोदी अहमदाबाद ते भुज या वंदे भारत मेट्रोच्या उद्घाटनासह ८ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी करतील. अहमदाबाद ते भुज ही देशातली पहिली वंदे भारत मेट्रो आहे.