भारतीय जागतिक मंच मध्य पूर्व राष्ट्र आणि अफ्रिका या उपक्रमाचं उद्घाटन आज दुबईत झालं. अमर्याद क्षितिजे ही यावर्षीच्या या उपक्रमाची संकल्पना आहे. दोन दिवस चालणाऱ्या या मंचाचे उद्दिष्ट तंत्रज्ञान, वित्त, शाश्वतता आणि नवोन्मेष यासह प्रमुख क्षेत्रांमध्ये भागीदारी मजबूत करणे आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे या कार्यक्रमाला संबोधित केलं.
भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातल्या मैत्रीपूर्ण संबंधाना जगामध्ये परस्पर विश्वास आणि सहकार्याचे मॉडेल म्हणून पाहिले जातं असं त्यांनी यावेळी म्हटलं. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे वार्षिक द्विपक्षीय व्यापार ८५ अब्ज डॉलरवर पोहोचला असून यामुळे, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना आणि स्टार्टअप्सना नवीन संधी मिळत असल्याचं त्यांनी नमूद केलं. या मंचाची ही चौथी आवृत्ती असून हवामान बदल, डिजिटल परिवर्तन आणि शाश्वतता यासारख्या जागतिक मुद्दयांवर यावेळी चर्चा होणार आहे.