भारत आणि जर्मनीने आज ग्रीन हायड्रोजन, तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी केली. नवी दिल्ली इथं शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चॅन्सलर ओलाफ शोल्झ यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले. गोपनीय माहितीची देवाणघेवाण आणि संरक्षण याबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. इंडो-जर्मन ग्रीन हायड्रोजन रोडमॅपसाठी वचनबद्ध असल्याचं दोन्ही देशांनी यावेळी सांगितलं. तसंच कौशल्य विकास, व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण क्षेेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले.
यावेळी झालेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रशिया-युक्रेन आणि पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत शांतता प्रस्थापित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचं सांगितलं. इंडो पॅसिफिक क्षेत्रात जलवाहतुकीचं स्वातंत्र्य गरजेचं असल्याचंही ते म्हणाले.