१९ वर्षांखालच्या मुलींच्या आशिया चषक क्रिकेट टी-ट्वेंटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतानं बांग्लादेशाला ४१ धावांनी पराभूत करत विजेतेपद पटकवलं आहे. भारतीय महिला संघानं या स्पर्धेतले सर्व सामने जिंकत दणदणीत विजय मिळवून इतिहास घडवला.
मलेशियात क्वालालंपूर इथं आज सकाळी झालेल्या या सामन्यात, बांग्लादेशानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारतानं प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सात बाद ११७ धावा केल्या. गोंगाडी त्रिशा हिनं ४७ चेंडूत ५२ धावा केल्या. भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना, बांगलादेशाचा संघ १८ षटकांत ७६ धावांवर गारद झाला. भारताकडून आयुषी शुक्लानं तीन बळी घेतले, तर परुनिका सिसोदिया आणि सोनम यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्रिशा या सामन्यातली, तसंच स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली.