सीमा भागात शांतता राखण्याबद्दल भारत आणि चीनदरम्यान सहमती झाली आहे. भारत-चीन सीमा प्रश्नविषयक सल्लामसलत आणि समन्वयासाठी कार्यरत संयुक्त यंत्रणेची ३१वी बैठक काल चीनमध्ये बीजिंग इथं पार पडली. या बैठकीत यावर सहमती झाली. सीमा भागात शांतता प्रस्थापित करणं आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर राखणं, ही बाब दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध पूर्वपदावर आणण्यासाठीचा आधारभूत मुद्दा असल्याचा पुनरुच्चारही दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी केला.
बैठकीत भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व परराष्ट्र मंत्रालयाचे, पूर्व आशिया क्षेत्रासाठीचे सह सचिव गौरंगलाल दास यांनी केलं, तर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या सीमा आणि महासागर व्यवहार विभागाचे महासंचालक होंग लियांग यांनी चीनी शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं.