नियंत्रण रेषेवरच्या उर्वरित भागातलं सैन्य पूर्णपणे हटवण्यासाठी तत्काळ आणि दुप्पट जोमानं प्रयत्न करण्यावर भारत आणि चीन यांच्यात सहमती झाली आहे. रशिया मध्ये सेंट पीटर्सबर्ग इथं झालेल्या एका बैठकीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार आयोगाचे संचालक वांग यी यांच्यात यावर सहमती झाली. दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध चांगले राहावेत यासाठी सीमाक्षेत्रांमध्ये शांतता प्रस्थापित करणं आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा सन्मान करणं आवश्यक असल्याचं डोवाल म्हणाले. दोन्ही देशांनी संबंधित द्विपक्षीय करार, प्रोटोकॉल आणि परस्पर सामंजस्य यांचं पालन करायला हवं असं त्यांनी सांगितलं.
सुरक्षाविषयक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी सुरु असलेल्या ब्रिक्स देशांच्या उच्च-स्तरीय अधिकारी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या बैठकीनंतर ही बैठक झाली.