भारत आणि चिली यांच्यात व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासाठी एक सर्वंकष आर्थिक भागिदारी करार करण्याच्या दृष्टीनं चर्चा सुरु करण्याबाबत दोन्ही देशांनी सहमती व्यक्त केली आहे. चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरीक फोन्ट यांच्या भारत भेटीबाबत बातमीदारांशी बोलताना परराष्ट्र सचिव पेरियासामी कुमारन यांनी ही माहिती दिली.
सध्या दोन्ही देशांमधे अंशत: व्यापार करार झालेला आहे. परस्पर हिताच्या दृष्टीनं व्यापक करार करण्याचं उद्दिष्ट आहे. भारताला कृषी उत्पादन निर्यातीचा विस्तार करायचा आहे, तर भारतीय बाजारपेठेत उपलब्ध नसलेल्या त्यांच्या काही कृषी उत्पादनांच्या निर्यातीसाठी चिली इच्छूक आहे, असं त्यांनी सांगितलं.
उभयपक्षी संबंध आणखी वाढवण्यासाठी आपला देश कटिबद्ध असल्याचं चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरीक फोन्ट यांनी सांगितलं.