पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारतीय खेळाडूंनी दिमाखदार कामगिरी करत, देशाच्या पदकसंख्येत काल आणखी भर घातली. स्पर्धेच्या पदकतालिकेत भारत पंधराव्या स्थानावर आहे. आज स्पर्धेच्या सहाव्या दिवशी भारतीय खेळाडू नेमबाजी, तिरंदाजी, ॲथलेटिक्स या खेळांमध्ये पदकांसाठी लढत देतील. नेमबाज अवनी लेखरा आणि मोना अगरवाल या महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन एसएच एक प्रकारासह अन्य प्रकारांमध्ये खेळणार आहेत. महिलांच्या रिकर्व्ह स्पर्धेत तिरंदाज पूजा, महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत एफ चौतीस प्रकाराच्या अंतिमफेरीत भाग्यश्री जाधव खेळतील. तसंच, पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत टी -त्रेसष्ट प्रकाराच्या अंतिम फेरीत मरियप्पन थांगावेलू, शैलेशकुमार आणि शरद कुमार हे पदकांसाठी आज मैदानात उतरतील.
तत्पूर्वी, भारताच्या सुमित अंतिल याने काल भालाफेक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं. तर बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरी स्पर्धेत नितेश कुमार यानं एसएल तीन प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं. एसएल चार प्रकारात सुहास यथिराज याने पुरुष एकेरी स्पर्धेत रौप्य पदक मिळवलं. महिलांच्या एसयू पाच प्रकारातही भारताची महिला बॅडमिंटनपटून तुलसीमाथी मुरुगसेन हिने रौप्य पदकाची कमाई केली. याच प्रकारात मनिषा रामदा हिनं तर एसएच सहा प्रकारात नित्याश्री सिवन हिनं कास्यपदक मिळवलं.
तिरंदाजी, मिश्र सांघिक प्रकारात राकेश कुमार आणि शीतल देवी यांनी काल कास्य पदकाची कमाई केली. पुरुषांच्या थाळी फेक एफ छप्पन प्रकाराच्या अंतिम फेरीत योगेश कथुनिया याने पाचव्या दिवशीचं पहिलं पदक जिंकलं. या सर्व पदक विजेत्या खेळाडूंचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे.