भारत आणि रशियानं व्यापारी संबंध आणखी दृढ करण्याची गरज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज व्यक्त केली. मुंबईत भारत – रशिया व्यावसायिक परिषदेला ते संबोधित करत होते. रशियाचे प्रथम उप प्रधानमंत्री डेनिस मान्टुरोव्ह यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते. दोन्ही देशांमधला व्यापार सध्या ६६ अब्ज अमेरिकन डॉलर आहे. २०३० पर्यंत हा व्यापार १०० अब्ज डॉलरच्या पलीकडे जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दळणवळण, बँकिंग आणि आर्थिक देवाण-घेवाणीच्या संदर्भातले अडथळे दूर करण्यासाठी दोन्ही देशांकडून प्रयत्न सुरू आहेत. लवकरच दोन्ही बाजूंना मान्य असलेला तोडगा निघेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.