भारत आणि पाकिस्ताननं कर्तारपूर साहिब कॉरिडॉर कराराची वैधता आणखी पाच वर्षांसाठी वाढवण्याचं मान्य केलं आहे. कर्तारपूर साहिब कॉरिडॉरद्वारे भारतातील यात्रेकरूंना पाकिस्तानमधील कर्तारपूर इथल्या पवित्र गुरुद्वारा दरबार साहिब, नारोवाल या ठिकाणांना भेट देता येते. यापूर्वी पाच वर्षांसाठी 24 ऑक्टोबर 2019 मध्ये हा करार करण्यात आला होता, त्यात आता आणखी वाढ करण्यात आली आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे.
दरम्यान, प्रत्येक यात्रेसाठी पाकिस्तानकडून आकारलं जाणारं 20डॉलर सेवा शुल्क काढून टाकण्याची विनंती यात्रेकरू वारंवार करत आहेत, त्याची दखल घेत भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला कोणतंही शुल्क आकारू नये असं आवाहन केलं आहे, असंही परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. सरकार देशातील शीख समुदायाला त्यांच्या पवित्र ठिकाणांना भेट देण्याची सुविधा देत राहील, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी समाजमाध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान भारत आणि चीन यांच्यातील सीमा वाद आणि गस्त याबाबत नुकत्याच झालेल्या करारानंतर या देशांमधील संबंध अधिक दृढ होतील अशी आशा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली आहे.गुटेरेस ब्रिक्स परिषदेलाही उपस्थित राहणार आहेत.भारत-चीन सीमा भागात एलएसी अर्थात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गस्त व्यवस्थेबाबत एक करार झाल्याचं भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सोमवारी सांगितलं .