येणाऱ्या काळात भारत आणि कुवेत यांचे संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदी यांनी आज कुवेत दौऱ्यात कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह, युवराज शेख सबाह अल खालेद अल हमाद अल मुबारक अल सबाह आणि कुवेतचे प्रधानमंत्री अहमद अल अब्दुल्ला अल सबाह यांच्याशी चर्चा केली. दोन्ही देशांच्या प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संरक्षण, सांस्कृतिक आदानप्रदान, क्रीडा याविषयीचे सामंजस्य करार आणि कुवेतला आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचं सदस्यत्व देण्याविषयी करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.
प्रधानमंत्र्यांनी कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांच्यासोबत औषधनिर्माण, माहिती-तंत्रज्ञान, फिन टेक, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा अशा प्रमुख क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याबाबत चर्चा केली. भारत आणि कुवेत यांनी द्विपक्षीय भागीदारी धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित करण्याचं ठरवलं आहे, अशी माहिती मोदी यांनी समाजमाध्यमावर दिली आहे.
या भेटीत कुवेतमध्ये राहणाऱ्या सुमारे १० लाख भारतीयांची काळजी घेत असल्याबद्दल मोदी यांनी कुवेतच्या राजांचे आभार मानले तर कुवेतच्या प्रगतीत भारतीय समुदाय देत असलेल्या योगदानाचे कौतुक कुवेतच्या राजांनी केले. भारत हा कुवेत आणि आखाती देशांचा मोलाचा भागीदार असल्याचंही त्यांनी सांगितलं.
मोदी यांना आज कुवेतच्या -’द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. कुवेतचे अमीर शेख मेशल अल-अहमद अल-जबेर अल-सबाह यांनी मोदी यांना हा पुरस्कार प्रदान केला.