यांच्यात लष्करी, वाणिज्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भागिदारी आणखी बळकट करण्यासाठी कॉपॅक्ट या नव्या उपक्रमावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध झालेल्या संयुक्त निवेदनात याविषयी अधिक माहिती दिली आहे.
संरक्षण भागीदारीसाठी नव्या दहा वर्षांच्या आराखड्यावर स्वाक्षरी केल्याची घोषणा भारत आणि अमेरिकेनं केली आहे. २०२५ ते २०३५ या दशकभरासाठी असणाऱ्या या आराखड्याचा हेतू दोन्ही देशातले संरक्षण संबंध दृढ करणं हा आहे. अमेरिका भारतासोबतच्या संरक्षण सामुग्री विक्री आणि संयुक्त उत्पादनावर अधिक भर देईल, असं दोन्ही देशांच्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. तसंच राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि रोजगार निर्मितीसाठी भारत – अमेरिके दरम्यानचे व्यापारी संबंध अधिक दृढ केले जातील, असंही यात म्हटलं आहे. येत्या ५ वर्षात दोन्ही देशांतला व्यापार दुपटीहून अधिक वाढवून ५०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला आहे. तसंच सप्टेंबरपूर्वी दोन्ही देशांमधल्या व्यापार कराराच्या चर्चांचा पहिला टप्पा पूर्ण करण्यालाही प्राधान्य दिलं जाईल. भारताला नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलं पुरवठ्यासाठी अमेरिकेला आघाडीचा पुरवठादार करण्यावरही दोन्ही देशांनी प्रतिबद्धता व्यक्त केली.
दहशतवाद समूळ नष्ट करण्यासाठी ठोस कृतीची गरज प्रधानमंत्री मोदी यांनी व्यक्त केली.
संरक्षण, AI, सेमीकंडक्टर, क्वांटम, जैवतंत्रज्ञान, ऊर्जा आणि अंतराळ क्षेत्रात दोन्ही देशातले शासकीय, शैक्षणिक आणि खासगी क्षेत्रातला द्विपक्षीय संवाद वाढवण्यासाठी TRUST उपक्रम सुरू करण्यावर दोन्ही देशांमध्ये सहमती झाली. अमेरिकी विद्यापीठांची केंद्र देशात सुरू करणं, भारत आणि अमेरिका यांच्या शैक्षणिक संस्थांचे संयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्यावरही यावेळी सहमती झाली. मुक्त, शांत आणि समृद्ध हिंद – प्रशांत प्रदेशासाठी दोन्ही देशातली भागीदारी उपयुक्त ठरेल असं यावेळी सांगण्यात आलं.