काँग्रेसनं कायमच लोकशाही आणि संविधान यांचं रक्षण आणि संवर्धन केलं आहे, असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमरावती इथल्या प्रचारसभेत सांगितलं. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर शेतकरी, महिला, युवा यांच्यासाठी कल्याणकारी योजना आणू, असं आश्वासन खर्गे यांनी दिलं.
महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत साडे सहा लाख कोटींचे सामंजस्य करार करून राज्यात उद्योग आणले, मात्र महायुती सरकारनं सर्व उद्योग गुजरातला नेले, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नांदेड जिल्ह्यात लोहा-कंधार मतदारसंघातल्या प्रचारसभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंगोली, परळी आणि आष्टी इथं प्रचारसभा घेतली.
दरम्यान, काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली. तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सुख्खू यामध्ये सहभागी झाले होते. काँग्रेसनं या राज्यांमध्ये जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पाळली नाहीत अशा खोट्या जाहिराती देऊन भाजपा जनतेची दिशाभूल करत आहे असा आरोप त्यांनी केला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जालना इथं प्रचारसभा घेतली. महायुती सरकारनं राज्याला लुटण्याचं काम केल्याची टीका त्यांनी केली. शेतीवर आधारीत उद्योग उभे करून त्या माध्यमातून युवक, महिलांसाठी रोजगार निर्मितीचा प्रयत्न करण्याचं आश्वासन पटोले यांनी दिलं. राज्यातल्या महिला, युवक आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महाविकास आघाडीला निवडून द्या असं आवाहन काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी सांगली इथल्या प्रचारसभेत केलं. पुण्यात काँग्रेसचे कँटोनमेंट मतदारसंघातले उमेदवार रमेश बागवे यांच्या मुख्य निवडणूक कचेरीचं उद्घाटन विधानसभेतील काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते झालं.