विधी आणि न्याय क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढणं ही सकारात्मक बाब असून, भारतीय न्याय व्यवस्था अधिक सृदृढ आणि बळकट असल्याचं ते द्योतक आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या मुलींच्या वसतीगृहाचं उद्घाटन आज फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील, न्यायमूर्ती रविंद्र घुगे, राज्याचे महा अधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु ए. लक्ष्मीनाथ, खासदार डॉ. भागवत कराड यांच्यासह विधी आणि न्याय क्षेत्रातले विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उत्तम न्याय व्यवस्थेमुळे गुंतवणूक प्रक्रिया ही कायदेशीररित्या होण्याचा विश्वास असल्यामुळे आपल्या देशात येण्यास गुंतवणूकदार उत्सूक असतात, त्याचंच फलित म्हणून आपण जगातली सर्वोत्कृष्ट अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल करत असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले. न्यायदानाची प्रक्रिया ही अधिकाधिक तंत्रस्नेही आणि लोकाभिमुख करण्यात आपण योग्यदिशेनं पावले टाकत असल्याचं त्यांनी सांगितलं.