राज्यात अनेक ठिकाणी होत असलेल्या जोरदार पावसामुळे विविध ठिकाणच्या नद्या आणि तलाव भरून वाहत आहेत.
सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस पडत असल्यानं वारणा आणि कोयना धरणातून नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातल्या ५ हजारहून अधिक जणांना पशुधनासह सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. सांगलीत आयर्विन पुल आणि मिरज या दोन्ही ठिकाणी कृष्णा नदी इशारा पातळीवरून वाहत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावं असं प्रशासनानं आवाहन केल आहे.
गोंदिया जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मोरगाव अर्जूनी तालुक्यातल्या नवेगाव बांध ते गोठनगाव या मार्गाच्या नाल्यावरचे पूल कोसळल्यानं जवळपास १० गावांचा संपर्क तुटला आहे.
अकोला जिल्ह्यातल्या काटेपूर्णा धरणाचा जलसाठा काल ८० टक्क्यांवर पोहोचल्यानं धरणाची चार दारं अंशतः उघडण्यात आली असून त्यातून प्रतिसेकंद ९२ घनमीटर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.