स्वामित्व योजनेद्वारे देशातील जनतेच्या उत्पन्नात वाढ होत असून कायदेशीर सनदेच्या आधारे बँकेतून कर्जाद्वारे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना मदत होईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रालयामार्फत दूरस्थ पद्धतीने स्वामित्व योजनेंतर्गत सनद वितरणाचा आरंभ करताना ते बोलत होते.
या कार्यक्रमात मुंबईतून राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यातील लाभार्थी उपस्थित होते.देशातील गरीबी कमी करायची असेल तर प्रत्येक नागरिकाजवळ मालमत्तेचे अधिकार असणं गरजेचं आहे असं सांगून मोदी म्हणाले की, 2014 पासून आम्ही ड्रोनद्वारे सर्वेक्षण करून नागरिकांना मालमत्ता पत्रक वितरित करत आहोत. 98 टक्के भूमी अभिलेखांचं संगणकीकरण करण्यात आलं असल्याचं त्यांनी नमूद केलं.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यातील सुमारे 60 लाखांहून अधिक कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा होईल. ही योजना केवळ शासकीय उपक्रमापुरती मर्यादित नसून, आर्थिक सक्षमीकरणाची मोठी संधी ठरेल, असं त्यांनी सांगितलं. राज्याच्या विविध जिल्ह्यातील लाभार्थी या दूरस्थ कार्यक्रमात सहभागी झाल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे.