भारतात येणाऱ्या काळात तरुणांची संख्या सर्वात जास्त असणार असून या तरूणांच्या कौशल्यविकासावर शासन भर देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राजस्थानमध्ये जयपूर इथं होत असलेल्या रायझिंग राजस्थान या वैश्विक गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते संबोधित करत होते. सध्या भारत तंत्रज्ञान आणि इंटरनेटच्या साहाय्यानं लोकशाही, लोकसंख्याशास्त्र आणि डेटा पॉवर या क्षेत्रांंमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. तसंच गेल्या दहा वर्षात भारत जगातली पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनली असून भारताच्या एफडीआय आणि निर्यात क्षेत्रामध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. राज्यांचा विकास हा महत्वाचा असून राजस्थान हे उद्योग क्षेत्रातलं विश्वासार्ह राज्य असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत ३२ राष्ट्रांच्या प्रतिनिधींसह, पाच हजारांहून अधिक व्यावसायिक, व्यापार प्रतिनिधी, राजदूत आणि गुंतवणूकदार सहभागी झाले आहेत. सतरा देश या परिषदेचे भागीदार आहेत. राज्यात गुंतवणुकीला चालना मिळावी म्हणून राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी ऊर्जा, एमएसएमई, पर्यटन तसंच खाणकाम यासंदर्भात नवीन ९ धोरणं लागू केली असून, या शिखर परिषदेला प्रारंभ होण्यापूर्वी गुंतवणुकीशी निगडीत तीस लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करारही करण्यात आले आहेत.