केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते काल शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणासाठीच्या राष्ट्रीय परीविक्षा आणि प्रशिक्षण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या नॅटस् 2.0 पोर्टलचे उद्घाटन करण्यात आलं. तसंच शिकाऊ उमेदवारांसाठी 100 कोटी रुपयांचा भत्ता थेट खात्यात हस्तांतरीत करण्यात आला. हे प्रशिक्षणार्थी, माहिती तत्रज्ञान, उत्पादन, स्वयंचलित वाहाने आणि इतर क्षेत्रात शिकत आहेत. तरूणांच्या कौशल्य आणि रोजगार क्षमतेवर लक्ष केंद्रीत करण्याच्या केंद्रासरकारच्या धोरणाशी हा पुढाकार निगडीत आहे.
याप्रसंगी बोलताना प्रधान म्हणाले की, नॅटस् पोर्टल हे शिकाऊ प्रशिक्षणाचे लोकशाहीकरण, कौशल्यातलं अंतर भरून काढणे, तरुणांच्या आकांक्षा पूर्ण करत त्यांना भविष्यासाठी तयार करण्याच्या दृष्टीने एक महत्त्त्वाचा प्रयत्न आहे. या पोर्टलमुळे शिकण्याच्या संधींचा आवाका वाढेल आणि उमेदवार- रोजगारप्रदाता यांच्यात जुळवून घेण्यास मदत होणार आहे.
यामध्ये प्रशिक्षणार्थी व्यवस्थेत विविध उदयोन्मुख क्षेत्रांचा समावेश असावा असेही प्रधान म्हणाले. देशातल्या लोकसंख्याशास्त्रीय लाभांशाचा उपयोग करून घेण्यासाठी सर्व हितसंबधीय भागीदारांनी सर्वसमावेशक धोरण आखण्याचे तसंच सर्व शैक्षणिक संस्था आणि उद्योगांना या पोर्टलमध्ये सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.