१८व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे. यंदा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या डॉक फिल्म बझारचं उद्घाटन आज झालं.
दिल्ली क्राइम या गाजलेल्या वेबसीरीजच्या निर्मात्या आणि एमी पुरस्कार विजेत्या अपूर्वा बक्षी यांनी नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या प्रांगणात मिफच्या डॉक फिल्म बझार या माहितीपट प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. महोत्सवाचे संचालक पृथुल कुमार आणि पत्रसूचना कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक स्मिता वत्स-शर्मा यावेळी उपस्थित होत्या.
नवोदित माहितीपट निर्मात्यांना आपलं काम वरिष्ठ निर्मात्यांना दाखवण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं हा या डॉक फिल्म बझारचा उद्देश आहे. मिफमध्ये आज विविध माहितीपट, लघुपट, ॲनिमेशनपट दाखवण्यात येत आहेत. तसंच चित्रपटांशी संबंधित विविध विषयांवरची मार्गदर्शनपर सत्रं, चर्चासत्रंही नॅशनल सेंटर फॉर पर्फॉर्मिंग आर्ट्स इथं होत आहेत.
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘Adventure to Revenue : GoPro and Youtube Success Strategies’ या विषयावर आज चर्चासत्र झालंलं. यतीश सुवर्ण, रिझ्झा अली, यश राणे, विजय कोशी, साई तेजा आणि नम्रता राजकुमार यांनी या चर्चेत भाग घेतला.