राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं सुशोभीकरण केलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकाचं लोकार्पण आज सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं. याच कार्यक्रमातून जिल्ह्यातल्या खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर या अन्य रेल्वेस्थानकांचं लोकार्पण देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. या वेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, कोकण रेल्वेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते.
सुशोभिकरणानंतर रेल्वेस्थानकं विमानतळांसारखी भव्य दिसत आहेत. स्थानकांमध्ये कोकण रेल्वेचे शिल्पकार मधू दंडवते यांची प्रतिमा लावण्यात आली असून, दर्शनी भागात व्हर्टिकल गार्डनही तयार करण्यात आलं आहे. चित्रांनी भिंती सजवण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेच्या एकूण ३२ रेल्वेस्थानकांचं टप्प्याटप्प्यानं सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधल्या १२ स्थानकांचा समावेश होता, असं चव्हाण यांनी सांगितलं.