सायबर सुरक्षा हा विषय केवळ डिजिटल व्यवहारांपुरता सीमित राहिला नसून देशाच्या संरक्षण यंत्रणेचं अविभाज्य अंग बनला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. आय फोर सी म्हणजेच भारतीय सायबर अपराध प्रतिबंधक समन्वय केंद्राच्या पहिल्या वर्धापन दिन सोहळ्यात आज नवी दिल्ली इथं ते बोलत होते. जगातल्या एकूण डिजिटल व्यवहारांपैकी जवळजवळ निम्मे व्यवहार भारतात होतात,त्यामुळे भारतात सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सायबर गुन्ह्यांविषयीच्या माहितीचं सर्वसमावेशक संकलन करण्यासाठी समन्वय या मंचाचं तसंच संशयित बाबींची नोंद करणाऱ्या सस्पेक्ट रजिस्ट्रीचं उद्घाटन त्यांनी केलं. या मंचावरची माहिती सर्व चौकशी यंत्रणांना उपलब्ध असेल. सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटरचं लोकार्पणही शहा यांनी या कार्यक्रमात केलं. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या पोलिसांना सायबर गुन्हेगारीविषयी माहिती आणि उपाययोजनांचं प्रशिक्षम देणाऱ्या सायबर कमांडो कार्यक्रमाचा प्रारंभ त्यांनी केला. सायबर गुन्हेगारी आणि त्यापासून बचावाचे उपाय याविषयी जनजागृती करण्यासाठी आय फोर सी मार्फत विशेष कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. देशभरातल्या ७२ दूरचित्रवाहिन्या, चित्रपटगृहं आणि इतर माध्यमातून जनतेपर्यंत ही माहिती पोहचवली जाणार आहे. सायबर सुरक्षेसाठी १९३० हा दूरध्वनी मदत क्रमांक आय फोरसी ने उपलब्ध करुन दिला आहे. या जनजागृती मोहिमेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी सहभाग घ्यावा असं आवाहन शहा यांनी केलं.
Site Admin | September 10, 2024 1:28 PM | Amit Shah | Cyber Secure Bharat