विधानसभा निवडणुकीच्या जागांसाठी रस्सीखेच सुरू असताना, पक्षबदलाचे वारेही जोरदार वाहात आहेत. माजी आमदार कपिल पाटील यांनी काल दिल्लीत काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. वाशिम जिल्ह्यातले वंचित बहुजन आघाडीचे माजी पश्चिम विदर्भ अध्यक्ष डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी काल मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.
दिवंगत आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी काल कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवरच हा पक्ष प्रवेश केला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान बीडमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लवकरच पुढचा राजकीय निर्णय घेऊ असंही त्यांनी सांगितलं.
मुंबईत माजी आमदार परशुराम उपरकर यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष अजित पवार तसंच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित होते.