महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळेल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. ते आज पुण्यात भाजपाच्या महाअधिवेशनाच्या समारोप सत्रात बोलत होते.
केंद्राकडून महाराष्ट्राला भरघोस निधी मिळाला, युती सरकारच्या काळात बरीच विकासकामं झाली, अनेक मोठे प्रकल्प राज्यात राबवले गेले, असं शहा म्हणाले. फक्त भाजपाच महान भारत घडवू शकतो, असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे अयोध्येत राममंदिर उभं राहिलं, त्यांनी देशातला दहशतवाद कमी केला, असं सांगत त्यांनी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांवर टीका केली. विरोधी पक्ष खोटा प्रचार करत असल्याचा आरोप शहा यांनी केला.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षांनी राज्यघटना, महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत भाजपावर आरोप करत केलेला खोटा प्रचार पक्षनेते आणि कार्यकर्त्यांनी हा प्रचार खोडून काढायला हवा, असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या अधिवेशनात मांडलं.
मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी आपली मतं स्पष्ट करावीत असं ते म्हणाले. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे आशीष शेलार, रावसाहेब दानवे यावेळी उपस्थित होते.