महाराष्ट्रात पुणे, मुंबई, ठाण्यासह इतरही अनेक जिल्ह्यात काल पावसाचा जोर होता. पुणे शहर आणि परिसरात मुसळधार पाऊस आणि धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळं काल शहरातील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक जिल्ह्यातील नद्यांना पूर आले असून, अनेक ठिकाणी नागरी वस्तीत पाणी शिरलं आहे. त्यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे.
अनेक गावांचा संपर्क तुटला असून, राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूकही प्रभावित झाली आहे. अनेक ठिकाणी पुरामुळं नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. ठिकठिकाणी राज्य आपत्ती निवारण दलाची पथकं तैनात करण्यात आली आहेत. सातारा जिल्ह्यातील कोयना आणि कण्हेर धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यास सांगलीला पूराचा धोका उदभवण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, गडचिरोली, चंद्रपूर, लातूर आदी जिल्ह्यांतही पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्याच्या बहुतांश भागात आजही पावसाची शक्यता असून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. या पार्श्र्वभूमीवर पुणे, ठाणे, नवी मुंबईसह विविध जिल्ह्यात शाळा-महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.