तीन ऑक्टोबर हा दिवस यापुढे ‘मराठी अभिजात भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने आज घेतला. या संदर्भातील मंत्रिमंडळाचा ठराव मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी वाचून दाखवला. मराठी भाषा मुळातच अभिजात होती. तिला अभिजात दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्राने सनदशीर मार्गाने प्रयत्न केले. गेले दशकभर यासाठी अनेक स्तरांवर प्रयत्न करण्यात येत होते. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा तमाम मराठी भाषिकांना आनंद झाला आहे. तसंच मराठी भाषेच्या विकासासाठी आणखी ऊर्जा, प्रेरणा मिळाली आहे असं या संदर्भातल्या मंत्रिमंडळाच्या ठरावात म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री या बैठकीसाठी उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल राज्य मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाचं अभिनंदन केलं आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. या निर्णयाचं महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे, तसंच राज्यातल्या जनतेच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळाचे आभार मानले आहेत. गेल्या अनेक दशकांची महाराष्ट्राची ही मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यामुळे पूर्ण झाली असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार यांनी दिली असून त्याबद्दल सर्व मराठी भाषाप्रेमींचं अभिनंदन केलं आहे. तसंच केंद्रसरकारचे आभार मानले आहेत.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा बहाल झाल्यामुळे होणाऱ्या बदलांबाबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.याखेरीज विविध राजकीय पक्ष, भाषाक्षेत्रात काम करणाऱ्या संघटना, संस्था आणि साहित्य वर्तुळातल्या अनेक मान्यवरांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.