देशात फौजदारी कायद्यासंदर्भात करण्यात येणाऱ्या सुधारणांबाबत एक चर्चासत्र आज चेन्नईत झालं. भारतीय न्याय संहिता, भारतीय साक्ष्य अधिनियम, आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी येत्या १ जुलैपासून होणार असून त्यासंदर्भात प्रबोधन करण्यासाठी हे चर्चासत्र झालं. केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांचं भाषण चर्चासत्रात झालं.
भारतीय दंड संहितेसारखे कायदे वसाहतवादी ब्रिटिश सरकारने केवळ भारतीयांना शिक्षा देण्यासाठी बनवले होते. आता सर्व राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेशांची प्रशासनं, तसंच सर्वोच्च आणि उच्च न्यायलयांमधले न्यायाधीश आणि इतर तज्ञांबरोबर सल्ला मसलत करुन हे बदल करण्यात आले आहेत, असं ते म्हणाले. माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांचं ही भाषण यावेळी झालं. देशभरातले तज्ञ वकील, न्यायाधीश, तसंच कायद्याचे विद्यार्थी चर्चासत्राला मोठ्या संख्येने उपस्थित होते.