मराठवाडा आणि लगतच्या भागात एक चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. या चक्रीय स्थितीमार्गे एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण छत्तीसगड ते मध्य महाराष्ट्रापर्यंत जात आहे. गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली.
राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान चंद्रपूर इथं ४२ पूर्णांक ४ दशांश अंश सेल्सिअस, तर सर्वात कमी किमान तापमान गोंदिया इथं १९ पूर्णांक ६ दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.
येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र, आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची, तसंच मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि गारा पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.