देशाच्या उत्तर भागात थंडीची लाट अद्याप कायम आहे. जम्मूकाश्मिरमध्ये थंडीचा कडाका वाढला असून, काल विविध भागात बर्फवृष्टी झाली. श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहातूक बर्फवृष्टी आणि निसरडया रस्त्यांमुळे बंद ठेवण्यात आली होती. दक्षिण काश्मिरच्या शोपिया जिल्ह्यातही मोठ्याप्रमाणात बर्फवृष्टी झाल्यानं मुगल रस्त्य वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. तर श्रीनगर तसंच राज्यातल्या विविध पर्यटनस्थळांवर पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसताहेत. मात्र वाहतूक विभागानं पर्यटकांना प्रवास करण्यापुर्वी रस्ते आणि महामार्गांच्या स्थिती जाणून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. बर्फवृष्टीमुळे काश्मीर विद्यापीठाच्या आज होणाऱ्या सर्व परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
हिमाचल प्रदेशातही डोंगराळ भागात हिमवृष्टी आणि सखल भागात पावसानं हजेरी लावली आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं असून मुख्य महामार्गांवर बर्फ साचल्यानं वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. राजधानी शिमला सहित किन्नौर, लाहौल स्फिती परिसरात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. रस्त्यांवर बर्फ साचल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी आणि स्थानिक प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं वाहन करण्यात आलं आहे.
उत्तराखंडामध्येही अनेक ठिकाणी हिमवृष्टी झाली असून जनजीवन प्रभावित झालं आहे.
दिल्लीसह मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेशचा आग्नेय भाग, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंडीगड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये आज पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. महाराष्ट्रातही विदर्भ मराठवाडा तसंच गुजरातमधील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.