देशाच्या उत्तर भागात थंडीची तीव्र लाट आली असून हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर, लडाख, आणि उत्तराखंडमधे अनेक ठिकाणी हिमवृष्टी होत आहे. जम्मू काश्मीरमधे रस्त्यांवर बर्फ साचत असून ते साफ करण्याचं काम प्रशासन करीत आहे. मात्र हिमवृष्टीचा अंदाज लक्षात घेऊन पर्यटकांनी सावधगिरी बाळगावी तसंच प्रशासन आणि वाहतूक विभागाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे. लडाखमधे सेनादलांच्या फायर अँड फ्युरी कॉर्प्सद्वारे द्रास हिवाळी कार्निव्हल 2024-25 आयोजित करण्यात आलं आहे. त्यात रोमांचक आइस हॉकी लीग सामने आणि तिरंदाजी स्पर्धा होत आहे.
हिमाचल प्रदेशात अधूनमधून होणारी हिमवृष्टी आणि पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे. शेती, फळबागा आणि फूलशेतीसाठी हा ओलावा उपकारक असल्याने शेतकऱ्यांमधे आनंदाचं वातावरण आहे. उत्तराखंडमधेही उंचावरच्या क्षेत्रात हिमवृष्टी होत असून सखल भागात पावसाने हजेरी लावली आहे.