आयसीसी चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्घेत आज दुबईत सुरु असलेल्या सामन्यात बांगला देशानं भारतापुढं विजयासाठी २२९ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे.
बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. ९व्या षटकात ५ बाद ३५, अशी त्यांची स्थिती झाली. मात्र त्यानंतर तोव्हिद हृदोय आणि जाकीर अली यांनी डाव सावरला. त्यांनी सहाव्या गड्यासाठी १५४ धावांची भागिदारी केली. तोव्हीदनं शतक झळकावलं, तर जाकीरनं ६८ धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्यांचा डाव दोन चेंडू बाकी असताना २२८ धावांवर संपला. भारतातर्फे महंमद शमीनं ५, हर्षित राणानं ३, तर अक्षर पटेलनं २ गडी बाद केले. महंमद शमीनं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधे २०० बळींचा टप्पा गाठला. तो सर्वात जलद हा टप्पा गाठणारा भारतीय खेळाडू ठरला.
भारताच्या डावाची सुरुवात चांगली झाली. कर्णधार रोहित शर्मा ४१ धावांवर बाद झाला, मात्र त्यानं त्याच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतल्या ११ हजार धावा पूर्ण केल्या. विराट कोहलीच्या खालोखाल सर्वात जलद हा टप्पा गाठण्यात त्यानं दुसरं स्थान मिळवलं आहे.
शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या २३ षटकात २ बाद ११२ धावा झाल्या होत्या.