आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत काल रात्री लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला 50 धावांनी हरवून भारताविरुद्ध अंतिम फेरी गाठली. न्यूझीलंडने दिलेल्या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक 363 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दक्षिण आफ्रिकेने निर्धारित 50 षटकांत 9 बाद 312 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने 100 धावा काढल्या, तर रॅसी व्हॅन डर ड्यूसेनने 69 धावा आणि कर्णधार टेम्बा बावुमाने 56 धावा केल्या.
न्यूझीलंडकडून कर्णधार मिचेल सँटनरने ३ बळी घेतले तर मॅट हेन्री आणि ग्लेन फिलिप्सने प्रत्येकी 2 बळी घेतले. तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत न्यूझीलंडने निर्धारित 50 षटकांत 6 बाद 362 धावा केल्या. रचिन रवींद्रने 101 चेंडूत 108 धावा केल्या, तर केन विल्यमसनने 94 चेंडूत 102 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी एनगिडीने 3 आणि कागिसो रबाडाने 2 तसंच वियान मुल्डरने 1 गडी बाद केला. रचिन रवींद्रला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा अंतिम सामना रविवारी 9 मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.