आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल दुबई इथं झालेल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांच्या अर्धशतकाच्या जोरावर 264 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद शमीने 3 तर वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल भारताने सहा गड्यांच्या मोबदल्यात हे उद्दिष्ट पार केलं.
विराट कोहलीने संयमी 84 धावा केल्या तर श्रेयस अय्यरच्या 45 , के एल राहुलच्या 34 चेंडूतील 42 आणि हार्दिक पांड्याच्या 24 चेंडूतील 28 धावांनी भारताने सहज विजय साकारला. विराट कोहलीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आलं. भारताचा अंतिम फेरीतील सामना आज होणाऱ्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यातील विजेत्या संघाशी येत्या 9 मार्च रोजी दुबईत होणार आहे.