आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेनं २०२४करता सर्वोत्कृष्ट खेळाडूंची नावं जाहीर केली. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा याला सर्वोत्कृष्ट कसोटीपटू तर महिला क्रिकेटमधे डावखुरी फलंदाज स्मृती मानधना हिला एकदिवसीय सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून स्थान मिळालं आहे.
पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेटमधे अर्शदीप सिंग सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला आहे.
जसप्रीत बुमराने गेल्या वर्षभरात १३ कसोटी सामन्यात ३५७ षटकात ७१ बळी मिळवले. भेदक यार्करचा मारा आणि सातत्यपूर्ण खेळ ही त्याच्या यंदाच्या कामगिरीची वैशिष्ट्यं ठरली.
स्मृती मानधना ने गेल्या वर्षभरात १३ एकदिवसीय सामन्यांमधे मिळून ७४७ धावा करुन विक्रमाची नोंद केली. यात ४ शतकी खेळी होत्या. हा देखील महिला क्रिकेटमधला विक्रम आहे. तिच्या एकूण कारकिर्दीतल्या २४ सामन्यांमधे मिळून तिने यंदा १ हजार ३५८ धावा पूर्ण केल्या.
पुरुषांच्या क्रिकेटमधे एकदिवसीय आणि टी ट्वेंटी प्रकारातला सर्वोत्कृष्ट संघाचा मान भारतीय संघाने पटकावला आहे.