केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव सध्या जपानच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी जपानच्या विविध खात्यांचे मंत्री आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. भारत आणि जपानमधली धोरणात्मक भागीदारी, डिजिटल व्यवहार, रेल्वे सेवा आदी मुद्यांवर या बैठकांमध्ये विस्तृत चर्चा करण्यात आली. जपानचे डिजिटल ट्रॉन्सफॉर्मेशन मंत्री तारो कोनो यांच्याशी वैष्णव यांनी भारत आणि जपानमध्ये डिजिटल व्यवहार अधिक व्यापक करण्याविषयी चर्चा केली. तसंच भविष्याच्या दृष्टीनं या क्षेत्रातल्या नवनवीन प्रयोगाविषयीही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. जपानचे पायाभूत सुविधा, दळणवळण आणि पर्यटन मंत्री तेत्सुओ सैतो यांच्यासोबत झालेल्या बैठकीत रेल्वे सेवा, आर्थिक वाढीला चालना देणं आणि दोन्ही देशातले सांस्कृतिक संबंध दृढ करणं याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. तसंच जपानच्या प्रधानमंत्र्यांचे विशेष सल्लागार मसाफुमी मोरी यांच्याशी धोरणात्मक भागीदारी व्यापक करण्याबाबत चर्चा करण्यासाठी वैष्णव यांनी बैठक घेतली.
Site Admin | September 6, 2024 12:46 PM | Japanese Minister for Digital Transformation Taro Kono | Minister Ashwini Vaishnaw