हिमाचल प्रदेशाच्या उंच डोंगराळ भागात झालेली बर्फवृष्टी आणि पावसामुळे संपूर्ण राज्य कडाक्याच्या थंडीत गारठून गेलं आहे. गेले तीन दिवस सुरु असलेल्या हिमवर्षावामुळे राज्यातल्या तीन राष्ट्रीय महामार्गांसह शेकडो रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत, आणि अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे.
किन्नौर जिल्ह्यात मल्लिंग नाला इथं अडकलेल्या पर्यटकांना चांगो आणि पूहमध्ये सुरक्षित ठिकाणी आसरा देण्यात आला आहे. दरम्यान, कुल्लू जिल्ह्यात, सोलंग नाला, अटल बोगदा, धुंडी आणि कोठी यांसारख्या भागात जोरदार हिमवृष्टीमुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झालं आहे. रस्त्यांवर साचलेला बर्फ बाजूला करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु असून, प्रशासनानं पर्यटक आणि स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याची सूचना दिली आहे. येत्या २६ डिसेंबर पर्यंत हिमाचल प्रदेशाच्या मैदानी भागात दाट धुकं आणि थंडीची लाट राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.