जागतिक मानवाधिकार दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली राजभवन इथं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती एन. एच. पाटील या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज्य मानवाधिकार आयोगाच्या वर्ष २०२४च्या स्मरणिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झालं. यानंतर सात विविध अतिसंवेदनशील घटकांच्या अधिकारांवर प्रकाश टाकणाऱ्या सत्रांचं आयोजन या कार्यक्रमात केलं आहे. पद्मश्री शंकर पापळकर अनाथ, दिव्यांग मुलांच्या हक्कांबाबत, डॉ. वैशाली कोल्हे दिव्यांग नागरिकांच्या अधिकारांवर, श्रीरंग बिजूर मानसिक दिव्यांगता असलेल्यांच्या अधिकारांबद्दल उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय व्हॅलेरियन पैस ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर, डॉ. वैशाली पाटील दुर्बल समाजघटकांमधल्या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर, संतोष चव्हाण शाश्वत जीवनाधारित शेतीवर, तर संजय पाटील कृषी जैवविविधता आणि समुदायांचे हक्क या विषयावर विशेष सत्रं घेणार आहेत. याशिवाय बांधावरची प्रयोगशाळा, आहार हेच औषध, महिला आणि मुलांच्या देहविक्रीबाबत जनजागृती इत्यादी विषयावरची दालनं आणि महात्मा गांधींच्या ११ शपथांवर आधारित प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे.
Site Admin | December 10, 2024 1:32 PM | Governor CP Radhakrishnan | Human Rights Day