परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, मूसा जमीर यांनी काल मालेमध्ये समुदाय विकास प्रकल्पांचं उद्घाटन करत सामंजस्य करारांची देवाणघेवाण केली. माले इथे परराष्ट्र मंत्री मूसा जमीर यांच्याशी झालेली चर्चा फलदायी झाल्याचं जयशंकर यांनी एक्स या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या चर्चेत विकास भागीदारी, क्षमता निर्माण, द्विपक्षीय आणि प्रादेशिक सुरक्षा, व्यापार आणि डिजिटल सहकार्य या विषयांचा समावेश होता. यावेळी रस्त्यावरील दिवे, मानसिक आरोग्य, मुलांची वाचा सुधार उपचार पद्धती आणि विशेष शिक्षण या क्षेत्रातील सहा मोठ्या आणि महत्वाकांक्षी प्रकल्पांचं संयुक्तपणे उद्घाटन करण्यात आलं.
मालदीवमध्ये डिजिटल पेमेंट प्रणाली सुरू करण्याबाबत भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन आणि मालदीवचे आर्थिक विकास आणि व्यापार मंत्रालय यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. मालदीवमधील सामुदायिक सक्षमीकरणासाठी भारताच्या वचनबद्धतेचा मैलाचा दगड म्हणून मालदीवच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी या बैठकीचं स्वागत केलं आहे. जयशंकर नऊ ते 11 ऑगस्ट दरम्यान मालदीवच्या दौऱ्यावर गेले आहेत.