भारत निवडणूक आयोगानं 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी सांगली जिल्ह्यात नोंदणी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जावून गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली देत आहे. याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी भारत निवडणूक आयोग आणि निवडणूक यंत्रणेचे आभार मानले आहेत. वाहतूक शाखा सांगलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या 91 वर्षांच्या मातोश्री मंगला कुलकर्णी यांनी गृह मतदान सुविधेव्दारे मतदान केलं. तर नेमिनाथनगर इथल्या 86 वर्षांच्या ज्येष्ठ नागरिक विद्या करमरकर, मिरज तालुक्यातील भोसे इथल्या 100 वर्षे वयाच्या चंपाबाई मगदूम, तसंच 85 वर्षांच्या सोनाबाई पवार यांनीही गृह मतदान केलं. त्याचबरोबर प्रतिबंधात्मक स्थानबद्ध असणाऱ्या मिरज विधानसभा मतदारसंघातील सांगली जिल्हा करागृहातही मतदान घेण्यात आलं.
ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातून गृहमतदानासाठी एकंदर 933 जणांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 8 आणि 9 नोव्हेंबर या दोन दिवसात 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदार मिळून 202 मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला आहे.
वाशिम जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांमध्ये दिव्यांग आणि 85 वर्षांच्या वरील ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गृह मतदान अंतर्गत रिसोड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच 546 मतदार तर सर्वात कमी 432 मतदार वाशिम विधानसभा मतदारसंघात आहेत. तर कारंजा विधानसभा मतदारसंघात 479 मतदार आहेत. गेल्या दोन दिवसात एकंदर 1 हजार 381 मतदारांनी गृहमतदान केलं आहे.