केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रात्री ईशान्य भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत. शनिवारी सकाळी, आसामच्या गोलाघाट जिल्ह्यात देरगाव इथं नूतनीकृत पोलिस अकादमीचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते होईल, यावेळी दुसऱ्या टप्प्याच्या ४२५ कोटी ४८ लाख रुपयांच्या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभही होणार आहे.
यानंतर, शहा मिझोरामला रवाना होतील, तिथं ते आसाम रायफल्सच्या स्थलांतराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणार आहेत. आसाम रायफल्सचं स्थलांतर राज्याच्या आइझॉल या राजधानीपासून सुमारे १५ किमी अंतरावर झोखॉसांग इथं होत आहे.
रविवारी सकाळी, ते आसामच्या कोकराझार जिल्ह्यातील डोटमा इथं जाऊन ऑल बोडो स्टुडंट्स युनियनच्या (ABSU) ५७व्या वार्षिक अधिवेशनाला संबोधित करणार आहेत. दुपारी गुवाहाटीला परत येऊन ते ईशान्य भारतातील आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) अंमलबजावणीच्या प्रगतीचा आढावा घेतील. या बैठकीत प्रत्येक राज्याकडून भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीबाबत सादरीकरण दिलं जाणार आहे.
रविवारी रात्री शहा नवी दिल्लीला रवाना होतील, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.