गेल्या वर्षभरात १६ हजार ९१४ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात पोलीस आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागाला यश मिळालं आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरची ही सर्वाधिक आकडेवारी आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली. ते आज दिल्लीत अंमली पदार्थ तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावरच्या परिषदेत बोलत होते. अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा मोहिमेचं तसंच मानस – दोन या हेल्पलाईन सेवेच्या सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या विस्ताराचं उद्घाटनही अमित शहा यांच्या हस्ते झालं.
ही मोहीम येत्या २५ जानेवारीपर्यंत चालणार आहे. या मोहिमेदरम्यान ८ हजार ६०० कोटी रुपये मूल्य असलेल्या सुमारे एक लाख किलो अंमली पदार्थांची विल्हेवाट लावली जाणार आहे. गेल्या दहा वर्षांत सुमारे २४ लाख किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि ५६ हजार ८०० कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली असल्याची माहितीही शहा यांनी दिली.
दरम्यान, अमित शहा उद्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून ते शनिशिंगणापूर आणि शिर्डीला भेट देणार आहेत. शिर्डीमध्ये होणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राज्य अधिवेशनाला ते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी शिर्डीत दाखल झालेत.