देशभरात आज धूलिवंदन आणि होळी उत्साहाने साजरी होत आहे. होळीचा सण हा ऋतुराज वसंताच्या आगमनाचं प्रतीक मानला जातो. होळीच्या दिवशी चांगल्याचा वाईटवरचा विजय म्हणून होलिका दहन केलं जातं आणि त्यानंतर रंगांची उधळण केली जाते.
देशभरात विविध ठिकाणी हा सण विविध पद्धतीने साजरा होतो. महाराष्ट्रात काल जागोजाग होळ्या पेटवून पारंपरिक पद्धतीने होळी साजरी झाली. मुंबई, ठाण्यात आज धुळवड खेळली जात आहे. गुजरातमध्ये द्वारकेत द्वारकाधीश मंदिरासह अन्य श्रीकृष्ण मंदिरांमध्ये फागुनी पूनम आणि फुलडोल उत्सव साजरा होत आहे. गुलालमिश्रित पाणी, अबीर आणि फुलांची उधळण केली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये हावडा, कोलकातासह अन्य भागांमध्ये होळीनिमित्त गौर परिक्रमा, भागवत सभा असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशातही होळीनिमित्त उत्साह दिसून येत आहे. लठमार होळी, फूलों की होळी, लड्डूमार होळी यांसह विविध प्रकारची होळी मथुरा-वृंदावन भागात सुरू आहे. ही होळी पाहण्यासाठी जगभरातून भाविक जमले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज गोरखपूरमध्ये भगवान नृसिंह विश्व यात्रेला हिरवा झेंडा दाखवला आणि उपस्थितांसोबत गुलाल उधळून होळी खेळली. अयोध्येत रामलल्ला आणि वाराणसीत काशी विश्वनाथाला आज होळीनिमित्त गुलाल अर्पण करण्यात आला. सण शांततेत पार पाडण्यासाठी राज्यभरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दिल्लीतही होळीचा उत्साह दिसून येत आहे. रमजानमधल्या दुसऱ्या शुक्रवारची प्रार्थना आजच असल्यामुळे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. दिल्लीची मेट्रो सेवा दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. राजस्थानात मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी काल रात्री आपल्या निवासस्थानी होलिका पूजन आणि दहन केलं.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळीचा सण भारताच्या अमूल्य सांस्कृतिक वारशाचं प्रतीक असून तो एकता, प्रेम आणि सौहार्दाचा संदेश देतो, असं राष्ट्रपतींनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलं आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही समाज माध्यमावरच्या संदेशातून सर्वांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होळी हा सण म्हणजे चांगल्याचा वाईटावर विजय आणि वसंत ऋतुच्या आगमनाचं प्रतीक आहे, असं धनखड आपल्या संदेशात म्हणाले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही देशवासियांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आनंदाने भरलेला हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन उत्साह आणि उर्जा आणेल, असं त्यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
होळी आणि धुळवडीनिमित्त आज देशातले शेअर बाजार बंद ठेवण्यात आले आहेत.