एचएमपीव्ही विषाणूमुळे होणारा आजार गंभीर नसून बरा होणारा आहे, लहान मुलं , वृद्ध तसेच इतर गंभीर आजार असणाऱ्यांनी काळजी घ्यावी असं वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. मंत्रालयात एच एम पी व्ही विषाणूसंदर्भात झालेल्या बैठकीत ते आज बोलत होते. सरकार लवकरच या परिस्थितीबद्दल सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्वे जारी करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करेल अस त्यांनी सांगितल.
राज्यात अजून एकही एचएमपीव्हीचा रुग्ण आढळलेला नाही. परंतु सर्व अधिष्ठात्यांनी औषधांसह ऑक्सिजन व आवश्यकता वाटल्यास विलगीकरणासाठी तयारीत रहावे. अतिरिक्त औषधासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना संपर्क करावा , अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. हा रोग राज्यात पसरु नये यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे तसंच अधिष्ठात्यांनी सतर्क राहून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द कराव्यात अशा सूचनाही मुश्रीफ यांनी दिल्या.यावेळी वैद्यकीय शिक्षण विभागाचे तसंच आयुष विभागाचे अधिकारी, आणि राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.